संबंधित विभागाचे दुर्लक्ष; दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?
चंद्रमुनी बन्सोड गोंदिया
सडक अर्जुनी । दि. ६ ऑक्टोबर २०२६ : रायपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पुतळी फाटा परिसरात अवैध व बेशिस्त पाकिंगचा प्रश दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महामार्गालगत असलेल्या पाणठेले, हॉटेल, धाबे, टायर दुकाने तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमुळे वाहनांची गर्दी वाढत असून, अनेक वाहने रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीने उभी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वेगवान वाहतुकीला धोका
राष्ट्रीय महामार्गावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, चारचाकी व दुचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. अशा वेगवान वाहतुकीच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला अचानक उभी असलेली वाहने इतर वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहेत. काही वेळा वाहनचालक महामार्गाच्या कडेला वाहन थांबवून खाद्यपदार्थ किंवा इतर साहित्य घेण्यासाठी उतरतात. त्यामुळे येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावे लागतात किंवा दुसऱ्या लेनमध्ये वळावे लागते. परिणामी अपघाताची शक्यता वाढत आहे.
रात्रीच्या वेळी धोका अधिक
पुतळी फाटा परिसरात रात्रीच्या बेळी परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अंधारात रस्त्याच्या कडेला उभी असलेली अवजड वाहने किंवा इतर वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने भरधाव वाहनांना त्यांचा अंदाज येणे कठीण जाते. त्यातच काही ठिकाणी वाहनांची पाकिंग रस्त्याच्या वाहतुकीच्या हद्दीजवळ होत असल्याने वाहतुकीचा सुरळीत प्रवाह बाधित होत आहे.
पादचाऱ्यांचीही सुरक्षितता धोक्यात
या परिसरातील हॉटेल, धाबे, पाणठेले व दुकाने याठिकाणी येणाऱ्या ग्राहकांनाही महामार्ग ओलांडावा लागतो. पार्किंगमुळे रस्त्याच्या कडेची जागा व्यापली जात असल्याने पादचाऱ्यांना महामार्गाच्या वाहतूकीजवळून मार्ग काढावा लागतो. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुर्लाच्या सुरक्षिततेचा प्रश निर्माण झाला आहे.
अपघाताची वाट पाहू नका!
महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत असताना पुतळी फाट्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. अवैध पार्किंगमुळे एखादा गंभीर अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष
अवैध पार्किंगवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या संबंधित विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पाकिंगसाठी निश्चित जागा, स्पष्ट सूचना फलक, आवश्यक ठिकाणी प्रतिबेधात्मक उपाययोजना आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक पावले उचालणे आवश्यक आहे. पुतळी फाटा परिसरातील अवैध पार्किंगचा प्रश्न वारंवार निर्माण होत असेल, तर संबंधित विभागाने नियमित पाहणी करून बेशिस्त पाकिंगला आळा घालावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.







